Mulshi Crime: ३० ते ४० जणांचा जमाव घुसला अन्…; मुळशी खुर्द येथे थरारक राडा, पोलिसांत गुन्हा दाखल
Mulshi Crime: मुळशी खुर्द येथे रस्त्याच्या मोजणीच्या प्रलंबित वादावरून रविवारी सकाळी १० वाजता खळबळजनक हाणामारी; पौड पोलिसांत गुन्हा दाखल.

Mulshi Crime – मुळशी तालुक्यातील मुळशी खुर्द येथे जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला बेदम मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वाती अमित जोरी (वय 45, रा. मुळशी खुर्द, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंदीप चौधरी, राजेंद्र चौधरी, पोकाराम चौधरी, स्वप्नील सनस, अनंता तापकीर,
राजेंद्र पोकाराम चौधरी, आकाश पिडले (रेड्डी), रमेश बलकवडे, यश सुर्वे, मनोज भिलारे तसेच त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 अनोळखी महिला व पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशी खुर्द येथील सर्व्हे क्रमांक 106/1 मधील रस्त्याच्या मोजणीचा वाद अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. असे असतानाही रविवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास संबंधित आरोपींनी रस्त्याचे खोदकाम सुरू केले.
यावेळी जोरी कुटुंबीयांनी तहसीलदारांच्या आदेशाचा हवाला देत काम थांबविण्याची विनंती केली. मात्र आरोपींनी शिवीगाळ करत लाठ्या, लोखंडी रॉड आणि दगडांच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या मारहाणीत स्वाती जोरी, त्यांचे पती अमित जोरी, मुलगा आर्या जोरी आणि भाचा जतिन भोईर हे जखमी झाले. तसेच आरोपी स्वप्नील सनस याने बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.




