मुक्ता.. माझी राजकारणातील पहिली मैत्रीण…; मैत्रिणीच्या निधनाने मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

पुणे – भाजप आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापैर मुक्ता टिळक अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. 23) दुपारी 3 वाजताच्या दरम्यान शाशकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुक्ता टिळक यांचे काल (दि. 22) दीर्घ आजाराने निधन झाले होते. मागील पाच महिन्यापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या.
अखेर गुरुवारी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. सकाळी 9 ते 11 पुण्याच्या ऐतिहासिक केसरी वाड्यात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते, त्यानंतर अंत्ययात्रा काढून अंतिम संस्कार करण्यात आले. टिळक यांच्या अंत्यसंस्काराला मोठा जनसमुदाय लोटला होता. यावेळी भाजप नेत्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते उपस्थित होते. अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून भावुक होत भावना व्यक्त केल्या.
मेधा कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट –
मुक्ता.. माझी राजकारणातील पहिली मैत्रीण…
आमचा दोघींचा राजकीय प्रवास बरोबरच सुरू झाला आणि दोघींनी वाटचालही सोबत केली. आज तिच्या अकाली जाण्याने माझी मैत्रिण हरवल्याचे दुःख झाले आहे. पहिल्यांदा नगरसेविका झाल्यावर मी, मुक्ता, अनुपमा लिमये एका बाकावर बसत असू. मुख्य सभेच्या पहिल्या दिवशी पर्यावरणाचा संदेश देत मी, मुक्ता, सरस्वती शेंडगे सायकल चालवत येत असू. महानगरपालिकेच्या मीटिंग्ज ना सोबत जाणे, येणे, पक्षाचे दौरे सोबत असत. या सगळ्या आठवणी आज एखाद्या चित्रपटांप्रमाणे समोर येत आहेत.
ती महापौर झाली, आमदार झाली याचा मला खूप आनंद झाला होता. तिला माझ्या कार्यालयात बोलावून तिचा सत्कार करताना अभिमान वाटला होता. महापौर म्हणून पुण्याच्या नावलौकिकात भर घालणारी कामगिरी तिने केली, तशी आमदार म्हणून घडावी असे वाटले पण नियतीची काही साथ मिळाली नाही.
मुक्ता अतिशय जिद्दी, लढाऊ वृत्तीची होती. मृत्युशीही शेवटापर्यंत झुंज देत ती लढली शेवटी तिची लढाई यशस्वी झाली नाही आणि अगदी लहान वयात ती आपल्यातून निघून गेली. अत्यंत आजारी असतानाही पक्ष कार्यास प्राथमिकता देऊन आमदार असताना मुंबईत जाऊन मतदान करणारी मुक्ताची कृती प्रत्येकाला संदेश आणि प्रेरणा देणारी आहे. तिच्या निधनाचे वृत्त खूपच दुःखद आहे. परमेश्वर तिच्या आत्म्यास सद्गती देवो आणि टिळक कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो🙏 हरि ॐ शांती 🙏


