Mukhyamantri Teerth Darshan Yojana : ‘तीर्थदर्शनातून ज्येष्ठांना आध्यात्मिक समाधान’ – एकनाथ शिंदे

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024 – ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली आहे. तीर्थयात्रा आध्यात्मिक मानसिक समाधानाची बाब आहे. कोल्हापूर, जळगाव नंतर तीर्थदर्शनासाठी तिसरी ट्रेन मुंबईतून आज रवाना होत आहे.
योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यातून तीर्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र दर्शनातून अध्यात्मिक व मानसिक समाधानाची पर्वणी ज्येष्ठ नागरिकांना मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संदेशामधून केले.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी विशेष ट्रेनने सीएसएमटी येथून आज रवाना झाले. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या तीर्थयात्रेकरुंच्या प्रवासाला सुरूवात झाली.
एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकारले आहे. प्रभू रामाचे दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या यात्रेकरूंना मिळते ही भाग्याची गोष्ट असून याचे समाधान वाटते.
पुढील काळात शेगाव, पंढरपूर बोधगया, दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणीही या तीर्थदर्शन यात्रेचे नियोजन केले जाणार आहे. ही योजना पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
यातून निवडलेला लाभार्थी हा भारतातील एकूण ७३ तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांना भेटी देणार आहेत. ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वृद्धावस्थेत उपयुक्त उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयांचे सहाय्य शासनाने दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.





