गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी पावणेदोनपर्यंत मुहूर्त; उद्यापासून गणेशोत्सवाचे आनंदपर्व

पुणे – वैभवशाली गणेशोत्सव शनिवारपासून (दि.७) सुरू होत असून गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे चार वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून ५१ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना दुपारनंतरही करता येऊ शकेल.
गणेशोत्सव शनिवारपासून (दि.७) सुरू होत आहे. यावर्षी गणेशोत्सव दहाऐवजी अकरा दिवसांचा आहे. शुक्रवारी (दि.६) भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरितालिका पूजन आहे. वाळूची शंकराची पिंड करून महिला त्याची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात. शनिवारी (दि.७) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे.
ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ०४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून ५१ मिनिटांपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विष्टिकरण (भद्रा) तसेच राहूकाल वर्ज्य नाही.
कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हीनंतरही करता येऊ शकेल, अशी माहिती ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली.
पूजा आणि मूर्ती अशी असावी
काही जणांकडे गणेशोत्सव दीड दिवस, पाच, सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस दररोज गणेशाची सकाळी आणि संध्याकाळी पूजा, आरती अवश्य करावी.
गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे, असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे, असे आहे.
त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र कृत्रिम तलावामध्ये, घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी.




