मानाचा पहिला कसबा गणपतींचा विसर्जन सोहळा भक्ती, परंपरा आणि जल्लोषात संपन्न

पुणे : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपतींचा विसर्जन सोहळा भक्तिभाव, परंपरा आणि जल्लोषाच्या वातावरणात पार पडला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात भक्तीरस, पारंपरिकता आणि सांस्कृतिक वारशाची शान अनुभवायला मिळाली.
मिरवणुकीत मिळणारा पहिला मान हा केवळ अग्रक्रमाचा नसून परंपरा आणि जबाबदारी जपण्याचाही आहे, हे कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही अधोरेखित केले. प्रत्येक चौकामध्ये निश्चित केलेले वेळापत्रक आणि उत्कृष्ट नियोजनाचा मेळ साधत मिरवणूकप्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच मिरवणूक पूर्ण करून दुपारी चारच्या सुमारास श्रींचे विसर्जन संपन्न झाले.
या सोहळ्यात भव्य दिंड्या, नगाऱ्यांचा गजर, बँड वादन आणि पारंपरिक ढोल-ताशांचा गगनभेदी नाद यामुळे वातावरण दुमदुमले. प्रभात बँड, कामायनी प्रशाला, जयती गजानन रथ आणि नगारखाना यांनी कलात्मकता सादर केली, तर परशुराम, रमणबाग आणि रूद्रगर्जना या ढोल पथकांनी जल्लोषाची उधळण केली.
मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग या सोहळ्यात विशेष जाणवला. शिस्तबद्ध वातावरण, पोलीस बांधवांचे संयमी नियोजन आणि पुणे महानगरपालिकेचे सहकार्य यामुळे हा ऐतिहासिक सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. श्रींच्या दर्शनाने समाधान लाभलेल्या भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.





