Mufti Abdul Baqi Noorzai : पाकिस्तानमध्ये आणखी एक हायप्रोफाइल हत्याकांड; एअरपोर्ट रोडवर गोळ्या घालून केली हत्या

Mufti Abdul Baqi Noorzai : पाकिस्तानमध्ये आणखी एक हाय प्रोफाइल हत्याकांड घडले आहे. क्वेटामध्ये जमियत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय) चे वरिष्ठ नेते ‘मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई’ यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. क्वेट्टा विमानतळाजवळ नूरझाईवर गोळ्या झाडण्यात आल्या. हा हल्ला अज्ञात हल्लेखोरांनी केला आहे.
या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षांत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या डझनहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले आहे.
हाफिज सईदच्या जवळच्या व्यक्तीची हत्या :
जम्मू आणि काश्मीरमधील अनेक घातक दहशतवादी हल्ल्यांसाठी हवा असलेला लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर झिया-उर-रहमान उर्फ नदीम उर्फ अबू कताल उर्फ कताल सिंधी याला शनिवारी संध्याकाळी पंजाब प्रांतातील झेलम भागात गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
रहमान हा लष्करचा संस्थापक हाफिज सईदचा विश्वासू सहकारी मानला जात असे. तो जम्मू-काश्मीरमधील पूंछ-राजौरी भागात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. रहमानने २००० च्या सुरुवातीला जम्मू भागात घुसखोरी केली होती आणि २००५ मध्ये तो पाकिस्तानात परतला. त्याचे पूंछ आणि राजौरीमध्ये दहशतवादी साथीदारांचे एक मजबूत नेटवर्क होते.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या तपासात रहमानचा अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले होते. २०२३ मध्ये राजौरीतील डांगरी गावात हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय एजन्सीने त्याच्याविरुद्ध अनेक आरोपपत्र दाखल केले होते.
१ जानेवारी २०२३ रोजी दहशतवाद्यांनी डांगरी गावात अंदाधुंद गोळीबार करून पाच जणांची हत्या केली. हल्लेखोरांनी घटनास्थळी एक इम्प्रोव्हायज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) देखील सोडले, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी आणखी दोन लोक ठार झाले, तर १४ जण जखमी झाले.
९ जून २०२४ रोजी शिव खोडी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवरील हल्ल्याचा सूत्रधार रेहमान असल्याचेही म्हटले जात होते. या हल्ल्यात नऊ यात्रेकरू ठार झाले, तर ४१ जण जखमी झाले.





