Disha Salian Case : एका तरूण नेत्याच्या करियर आणि भविष्यावर चिखल; दिशा सालियान प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक

मुंबई : दिशा सालियानचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या देशात महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरण घडत असतात कुटुंबीय, आई-वडिल हे न्यायासाठी समोर येतात. न्याय मागण्याचा प्रयत्न करतात. पोलीस तपासाला सहकार्य करतात. ही एक प्रथा आहे. पाच वर्षानंतर त्याचे म्हणणे आहे की, आमच्यावर दबाव होता. यावर कसा विश्वास ठेवणार तुम्ही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
दिशाचे कुटुंबिय आई-वडील न्यायासाठी समोर येतात न्याय मागतात आणि पोलीस तपासाला सहकार्य करतात. पाच वर्षानंतर त्याचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर दबाव होता. याच्यावरती कसा विश्वास ठेवणार? ठाकरे कुटुंब आणि शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून हे पुन्हा एकदा स्पष्ट दिसत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटले
पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटले, औरंगजेबला कबरेतून बाहेर काढले आणि आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला पण त्यांच्यावरच उलटला. औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण शिजत आहे. यामागे कोणाची प्रेरणा आहे? कोणाची शक्ती आहे? पडद्यामागे कोण हालचाली करत होते याची माहिती आम्हाला आहे. अशाच प्रकारे तुम्ही राजकारण करणार असाल तर तुम्हालाच लक लाभ, असे म्हणत संजय राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
औरंगजेबाला साडे तीनशे वर्षांनंतर बाहेर काढल्यावर अशा अनेक कबरी तुम्ही खोदत आहात त्यामध्ये शेवटी तुम्हाला जावे लागणार. एका तरूण नेत्याच्या करियर आणि भविष्यावर चिखल ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर प्रयोग झाले पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. तरीही लिगल सेल काम करत आहे, पण कोणत्या थरापर्यंत जायचे हे राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे, असे राऊत म्हणाले.
पुढे म्हणाले, भाजपची सत्ता आल्यावर भाजपमध्ये काही बाटगे गेल्यापासून एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांचे जे अस्वस्थ आत्मे आहेत. त्यांच्या हाताला फारसे काही लावत नाही, त्यांना राजकारणामध्ये प्रतिष्ठा मिळत नाही, सत्ता आली तरी अस्वस्थ आहेत त्यातून त्यांना गागाळ्या सुचतायेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दिशा सालियन प्रकरण काय?
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मॅनेजर म्हणून काम केलेल्या दिशा सालियनच्या मृत्य सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच झाला होता. 28 वर्षीय दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूमध्ये केवळ पाच दिवसांचे अंतर होते. 8 आणि 9 जून 2020 च्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिशाचा एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाला.
त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. या दोघांच्या मृत्यूचा संदर्भ अनेकांनी जोडला. दिशाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तिच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यात आला. तिच्या पोस्टमॉर्टमसाठी वेळ जाणूनबुजून लावण्यात आला का असा सवालही उपस्थित करण्यात आला.
आदित्य ठाकरेंचे काय कनेक्शन?
8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी सुरु होती. या पार्टीत दिशाचा होणारा नवरा रोहन राय आणि जवळची मंडळी उपस्थित होती. थोड्याच वेळात अचानक या ठिकाणी आलेल्या हायप्रोफाईल व्यक्तींमुळे वातावरण बदलले, असे बोलले जात आहे. या हायप्रोफाईल व्यक्तींमध्ये तत्कालिनमंत्री आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांचा समावेश होता असे सांगितले जात आहे. दिशा सालियनवर अमानुष सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीतून समोर आल्या आहेत. दिशाचे तोंड बंद करण्यासाठी तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.





