MSRTC Update – एसटीच्या पुणे विभागात पुणे- बारामती मार्गावर राजमाता जिजाऊ शटल बससेवेचा शुभारंभ झाला आहे. या सेवेचा विस्तार करण्यासाठी पुणे एसटी विभागाकडून राज्य परिवहन महामंडळाकडे २५० बसची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे विभागात अन्य मार्गांवरही शटल बससेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज राजमाता जिजाऊ बससेवेचा शुभारंभ राज्यपातळीवर नुकताच पार पडला असून, येत्या काही महिन्यात राज्यभरात टप्प्याटप्प्याने सुमारे तीन हजार बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामध्ये पुणे एसटी विभागालाही काही गाड्या देण्यात येणार आहे. दरम्यान, मागील आठवड्यात पुणे विभागात राजमाता जिजाऊ शटल सेवेची सुरुवात झाली असून, बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजमाता जिजाऊ बस महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये ५६ प्रवासी आसन क्षमता असून, सुरक्षेच्या दृष्टीने पाच सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, पॅनिक बटण सुविधा, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यामुळे नोकरदार महिला, विद्यार्थिनी, तसेच दैनंदिन प्रवाशांसाठी ही सेवा अधिक उपयुक्त ठरणार आहे. यामुळे सकाळी आणि सायंकाळी पीक अवर्समध्ये कामानिमित्त शहरात ये- जा करणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. पुणे विभागाकडून महामंडळाकडे २५० बसची मागणी केली आहे. येत्या महिन्याभरात १०० बस दाखल होण्याची शक्यता असून, या बसमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. कोणत्या मार्गावर बस चालवायचे, याचेही नियोजन करण्यात आले आहे. – कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी