MS Dhoni Reaction : धोनीचा शब्द अन् प्रशांतचा शॉट! १४.२ कोटींच्या खेळाडूवर माही का झाला फिदा? पाहा सराव सत्रातील ‘तो’ VIDEO
MS Dhoni Reaction : सीएसकेच्या गोटातून एक रंजक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये महेंद्र सिंह धोनी युवा खेळाडूंना गुरुमंत्र देताना दिसत आहे.

MS Dhoni Reaction Prashant Veer batting video viral : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने आपल्या सोशल मीडियावरून खेळाडूंच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीमचा ‘मेंटॉर’ आणि दिग्गज खेळाडू एम.एस. धोनी युवा अष्टपैलू प्रशांत वीर याच्या फलंदाजीचे बारकाईने निरीक्षण करताना दिसत आहे. प्रशांतने मारलेल्या प्रत्येक शॉटवर धोनीने दिलेली दाद पाहून, या युवा खेळाडूला यंदाच्या हंगामात प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्याने संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मैदानात फटकेबाजी, बाहेर धोनीचा ‘मोलाचा’ सल्ला –
सराव सत्रादरम्यान प्रशांत वीरने ऑफ साईड, स्कूप शॉट आणि जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह मारून सर्वांचे लक्ष वेधले. प्रत्येक शॉटवर धोनीने ‘शॉट’ म्हणत त्याचे कौतुक केले. मात्र, केवळ क्रिकेटच नाही तर आयुष्याचा धडाही धोनीने या युवा खेळाडूला दिला आहे. प्रशांतने ‘स्पोर्ट्सस्टार’शी बोलताना सांगितले की, “धोनी सरांनी मला अचानक मिळालेल्या या मोठ्या रकमेनंतर (१४.२ कोटी) पाय जमिनीवर ठेवण्याचा आणि पैसे नीट वाचवण्याचा सल्ला दिला आहे.”
Prasanth : 🏏💥
MSD : 🗣️ SHOTTT!The reaction from behind the stumps!#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/hCKuCp9TaM
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2026
कोण आहे प्रशांत वीर?
उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा २१ वर्षीय प्रशांत वीर हा एक आक्रमक फलंदाज आणि डावखुरा फिरकीपटू आहे. सीएसकेने मिनी ऑक्शनमध्ये त्याच्यावर १४.२ कोटी रुपयांची मोठी बोली लावली होती. त्याने आतापर्यंत ३ प्रथम श्रेणी, ८ लिस्ट-ए आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख असून, रवींद्र जडेजाच्या जोडीला तो सीएसकेसाठी हुकुमी एक्का ठरू शकतो.
हेही वाचा – Dasun Shanaka : संजू सॅमसन चेन्नईत अन् सॅम करन जखमी! राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं असताना संगकारांनी शोधला मास्टर ‘रिप्लेसमेंट
गेल्या दोन मोसमात प्ले-ऑफ गाठण्यात अपयशी ठरलेला चेन्नईचा संघ यंदा नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. धोनीच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा ही युवा जोडी चेन्नईला सहावे जेतेपद मिळवून देण्यात काय भूमिका बजावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





