MPSC Update : एमपीएससी अर्ज प्रक्रिया बदलली! नवी डिजिटल पडताळणी प्रक्रिया सुरू ; अधिक माहितीसाठी वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. आता उमेदवारांना अर्जातील दाव्यांच्या पडताळणीसाठी मुलाखतीची वाट पाहावी लागणार नाही. ऑनलाइन अर्ज भरतानाच संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक, वेगवान होईल. मात्र, उमेदवारांना आता अर्ज भरतानाच सजग सजग राहावे लागणार आहे.आतापर्यंत उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांची (उदा. आरक्षण, खेळाडू, दिव्यांग) कागदोपत्री पडताळणी मुलाखतीच्या टप्प्यावर होत असे.
अनेकदा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने पात्र उमेदवारही प्रक्रियेतून बाहेर फेकले जात. ही समस्या टाळण्यासाठी, प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे.नवीन नियमानुसार ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना पात्रतेविषयी केलेल्या दाव्याच्या पुष्टीसाठी आवश्यक कागदपत्र किंवा प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड केल्याशिवाय अर्ज अंतिमरित्या सादर करता येणार नाही. आयोगाने एकूण २० संभाव्य कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये शैक्षणिक अर्हता, वय, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र, तसेच खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांसारख्या विशेष आरक्षणाशी संबंधित प्रमाणपत्रांचा समावेश आहे.एखाद्याने आवश्यक कागदपत्र अपलोड केली नाही किंवा चुकीचे कागदपत्र अपलोड केल्यास त्याचा अर्ज थेट बाद होणार नाही. त्याला वैध पुरावा सादर करण्यासाठी सात दिवसांची संधी दिली जाईल.
याची सूचना उमेदवाराला ई-मेल, एसएमएस किंवा आयोगाच्या संकेतस्थळावरील प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली जाईल. मुदतीत कागदपत्रे सादर केली तर पडताळणी करूनच त्याचा दावा मान्य होईल.यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच उमेदवारांच्या दाव्यांची सत्यता तपासली जाईल. त्यामुळे केवळ पात्र उमेदवारच परीक्षेस पात्र ठरतील. मुलाखतीच्या टप्प्यावरील प्रशासकीय भार कमी होईल. यामुळे परीक्षार्थींनी अर्ज भरण्यापूर्वीच सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत.




