MP : कुनो नॅशनल पार्कमधून चित्ते हलवणार नाही – केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव

ग्वाल्हेर :- मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या चित्यांचे मृत्यू होत असल्याने उर्वरीत चित्त्यांच्या सुरक्षित स्थलांतराची चर्चा सुरू आहे. तथापि, या पार्कमधून चित्तांचे स्थलांतर करण्याची कोणतीही योजना नाही, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
भुपेंद्र यादव म्हणाले, या प्रकल्पाकडे सरकार अत्यंत संवेदनशीलतेने पाहात आहे. या पार्कमध्ये आणण्यात आलेल्या चित्त्यांपैकी नऊ चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. चित्त्यांच्या देखरेखीबाबत नामिबिया येथील तज्ज्ञांशीही संपर्क साधला जातो. या चित्त्यांच्या बाबतीत सर्व वन अधिकारी आणि पशुवैद्यक खूप मेहनत घेत आहेत. फेबुवारी 2022 पासून दोन टप्प्यात हे चित्ते तेथे आणण्यात आले आहेत.
ते म्हणाले की, आम्हाला प्रत्येक चित्त्याबद्दल पूर्ण काळजी आहे. हा प्रकल्प पूर्णत: यशस्वी व्हावा अशी सरकारची इच्छा आहे. हा एक मोठा प्रकल्प आहे ज्यामध्ये दरवर्षी चित्ते यावे लागतात. आम्ही त्याची संवेदनशीलता स्वीकारतो, असेही ते म्हणाले.
17 सप्टेंबर 2022 रोजी नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आठ चित्ते आणण्यात आले, तर या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले आहेत. मार्चमध्ये येथे जन्मलेल्या चित्त्यांच्या चार पिल्लांपैकी तीन पिल्ले दगावली आहेत. या पार्कमध्ये सध्या 15 चित्ते आहेत.





