खासदार श्रीरंग बारणे यांचे फेसबुक पेज ‘हॅक’; नागरिकांना आवाहन करत म्हणाले…

Shreerang Barne : गेल्या काही वर्षांत एखाद्या व्यक्तीचे सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंट हॅक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा अकाउंटवरून चुकीचा संदेश आणि पैशांची मागणी देखील करण्यात आल्याचा प्रकार अनेकांसोबत घडला आहे. आता फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार चक्क शिवसेनेच्या एका खासदारसोबत घडला आहे.
शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे फेसबुक अकाउंट पेज हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बारणे यांनी पिंपरी चिंचवड सायबर शाखेकडे तक्रार केली असून या पेजवरून चुकीचा संदेश किंवा पैशांची मागणी केली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन बारणे यांनी केले आहे.
खासदार बारणे यांचे फेसबुकवर Shrirang Appa Barne या नावाने पेज आहे. हे पेज हॅक करण्यात आले आहे. या पेजवरील आधीचे फोटो हॅकर्संनी डिलीट केले आहेत, तर काही नवीन फोटो अपलोड केले आहेत, ही बाब बारणे यांच्या लक्षात येताच हॅकर्स विरोधात त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितली आहे.
फेसबुक पेज हॅक झाले आहे. या पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट आल्यास त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करू नका, पैशांची मागणी केल्यास प्रतिसाद देऊ नका, त्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन बारणे यांनी केले आहे. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.





