खासदार प्रणिती शिंदेनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय जनगणना करण्याची केली मागणी

नवी दिल्ली : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी आजवर अनेक आंदोलने केली. तर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले त्यांचे उपोषण त्यांनी स्थगित केले आहे. पण आज बुधवारी (ता. 24 जुलै) काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, लोकसभेतील पहिल्यात भाषणातून त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संसदेतील सदस्यांचे या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
लोकसभेत भाषण करताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सरकार अनेक कंपन्यांचे खासगीकरण करत आहे. यामुळे आरक्षण संपवण्याचे कटकारस्थान सुरू आहे. आमच्या महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. धनगर समाज एसटीत येण्यासाठी मागणी करत आहेत. परंतु, राज्य सरकार तणाव वाढवत आहेत, असा थेट आरोपच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
तर, केंद्र आणि राज्य सरकार भाजपाचे आहे. मग या प्रकरणी निकाल द्यायला एवढा वेळ का लावला जात आहे? असा प्रश्न उपस्थित करत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सतत महाराष्ट्रात तणाव वाढत आहे. माझी मागणी आहे की मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावर बोलावे आणि निर्णय द्यावा. जातीय जनगणनेची मागणी राहुल गांधींनी केली आहे. महिला आरक्षणाचे बिल पास केले. पण अजूनही जातीय जनगणना झालेली नाही. जोपर्यंत बिल पास होत नाही तोवर आमच्या बांधवांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे मी एकच सांगेन की जातीय जनगणना लवकरात लवकर करून आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी संसदेत केली.





