MP Politics : ज्योतिरादित्य शिंदेंच्या समर्थकाची कॉंग्रेसमध्ये वापसी

भोपाळ :- मध्यप्रदेशमधील नेते बैजनाथसिंह यादव यांनी बुधवारी भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये वापसी केली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक अशी त्यांची ओळख होती. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेली घडामोड राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे.
मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य आणि त्यांच्या काही समर्थक आमदारांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार कोसळून पुन्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला. त्यावेळी ज्योतिरादित्य यांच्या समवेत पक्षबदल केलेल्या यादव यांना भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बनवले. आता यादव भाजपची साथ सोडून स्वगृही परतले आहेत.
त्यांच्या प्रमाणेच भाजपचे अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष सोडतील. योग्यवेळी ते कॉंग्रेसमध्ये दाखल होतील. त्यामध्ये ज्योतिरादित्य यांच्या समर्थकांचाही समावेश असेल, असा दावा कॉंग्रेस नेत्यांकडून करण्यात आला.
मध्यप्रदेशात चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्यामुळे त्या राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातून पक्षबदलाच्या सत्रालाही उधाण येण्याची चिन्हे आहेत.





