English paper leak: 10 वीचा इंग्रजीचा पेपर फुटला; महिला शिक्षिकेने प्रश्नपत्रिका ठेवली व्हॉट्सॲप स्टेटसवर
English paper leak:

English paper leak: मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असतानाच एका महिला शिक्षिकेने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते स्वतःच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट केल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षिकेसह परीक्षा केंद्र प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तुकईथड येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी १० वीचा इंग्रजीचा पेपर होता. परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळी ९:३५ च्या सुमारास प्राथमिक शिक्षिका राजकुमारी सोनी यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो दिसून आले. एका गैरहजर विद्यार्थ्याच्या टेबलावर असलेल्या प्रश्नपत्रिकेचे फोटो शिक्षिकेने काढल्याचा आरोप आहे. हे फोटो त्यांनी अन्य एका व्यक्तीला पाठवले होते, जेणेकरून उत्तरे मिळवून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवता येईल.
प्रशासकीय कारवाईचा बडगा –
पेपर लीकची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हर्ष सिंह आणि जिल्हा पंचायत सीईओ सृजन वर्मा यांनी तातडीने परीक्षा केंद्रावर धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने खालील कारवाई केली आहे. गोपनीयता भंग केल्याप्रकरणी शिक्षिका राजकुमारी सोनी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत परीक्षा केंद्र प्रमुख जितेंद्र कुमार कुलकर्णी आणि सहाय्यक केंद्र प्रमुख अनिता दीक्षित यांनाही इंदूर विभागीय आयुक्तांनी निलंबित केले आहे.
पोलीस अधीक्षक देवेंद्र कुमार पाटीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेवर ‘मध्य प्रदेश मान्यताप्राप्त परीक्षा अधिनियम’ आणि ‘आयपीसी’च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाचा ‘पेपर लीक’चा दावा फेटाळला –
दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने ही घटना तांत्रिकदृष्ट्या ‘पेपर लीक’ नसल्याचा दावा केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पेपर सकाळी ९ वाजता सुरू झाला होता, तर शिक्षिकेने फोटो ९:०६ वाजता स्टेटसवर टाकला. सर्व १०९ विद्यार्थी सकाळी ८:४० वाजेपर्यंतच परीक्षा केंद्राच्या आत गेले होते, त्यामुळे पेपर बाहेरच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही आणि परीक्षा सुरळीत पार पडली, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे.





