Bhigwan girl kidnapping case: इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातून एका तरुणीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती, मात्र आता या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित तरुणीने स्वतःचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला असून, आपले अपहरण झाले नसून आपण स्वमर्जीने प्रियकरासोबत गेल्याचा खुलासा तिने केला आहे. यामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. प्रकरण अपहरणाचे नसून प्रेमसंबंधातून घडल्याचे स्पष्ट – लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या या तरुणीचे अपहरण दोन तरुणांनी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून जबरदस्तीने तरुणीला नेण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते. मात्र, तरुणीने व्हिडिओद्वारे दिलेल्या माहितीमुळे हे प्रकरण अपहरणाचे नसून प्रेमसंबंधातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दीड महिन्यात दोघांमध्ये अकरा वेळा संपर्क – व्हिडिओमध्ये तरुणीने असे नमूद केले आहे की, तिचे संबंधित मुलासोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्या मुलाने तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नसून ती स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत निघून आली आहे. दरम्यान, पोलिसांच्या तांत्रिक तपासातही काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. गेल्या दीड महिन्यात या दोघांमध्ये अकरा वेळा संपर्क झाला असून, यात मुलाने तीन वेळा तर मुलीने आठ वेळा एसएमएसद्वारे संपर्क साधला आहे. हे फोन कॉल्स प्रामुख्याने मध्यरात्री उशिरा झाले असून त्यांचे ड्युरेशन अवघे तीन ते पाच सेकंद इतकेच आहे. दोघांचा शोध सुरू – साध्या कॉलवर अवघे काही सेकंद बोलल्यानंतर त्यांचे व्हॉट्सॲपवर बोलणे सुरू होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस सध्या या दोघांचे व्हॉट्सॲप चॅट आणि कॉल डिटेल्स मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. तरुणीने व्हिडिओद्वारे आपला खुलासा केला असला, तरी पोलीस अद्याप या दोघांचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे भिगवण परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रेमप्रकरणातून रचलेले हे ‘नाट्य’ आता पोलिसांच्या तपासाचा मुख्य विषय ठरले आहे.