खासदार महुआ मोईत्रा यांचे ट्वीट व्हायरल; भाजपवर टीका करत म्हटले,”गौमूत्राचे काही डोसही घेऊन या”

नवी दिल्ली : लोकसभेतील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या सध्या त्यांच्या एका ट्वीटमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या महुआ मोईत्रा यांचे ट्विट व्हायरल झाले असून त्यात त्यांनी भाजपवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे.
खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये , मी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहे. भाजपच्या हेकलर टीमनं तयार राहावं. सोबतच गौमूत्राचे काही डोसही घेऊन या, असे म्हटले आहे. मोईत्रा यांनी हे ट्वीट 3 फेब्रुवारी रोजीसकाळी केले यानंतर दुपारी लोकसभेत बोलताना महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, या सरकारला इतिहास बदलायचा आहे, वर्तमानावर विश्वास नाही आणि भविष्याची भीती आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोललेल्या गोष्टी केवळ बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
Am speaking this evening in Lok Sabha on President’s Address.
Just wanted to give early heads up to @BJP to get heckler team ready & read up on imaginary points of order. Drink some gaumutra shots too.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) February 3, 2022
पुढे बोलताना मोईत्रा म्हणाल्या, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इतर महापुरुषांचा उल्लेख केवळ नावापुरताच केला गेला. त्यांच्या विचारांचे पालन मात्र होत नाही, असं त्यांनी म्हटलं. त्यांनी म्हटलं की, सरकारने सर्व धर्मांबाबत तटस्थ वृत्ती बाळगली पाहिजे असे नेताजींनी म्हटले होते आणि ते असते तर त्यांनी यापूर्वी हरिद्वार धर्म संसदेत मुस्लिमांविरुद्ध कथित वक्तृत्वाला परवानगी दिली असती का? असा सवाल देखील खासदार मोईत्रा यांनी केला.
हे सरकार घाबरले आहे, त्यामुळे विरोधकांना दडपण्यासाठी सीबीआय अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवला जात आहे. नोकरशहांना भीती वाटते, म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा संवर्ग नियमांमध्ये बदल करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. महुआ मोईत्रा यांनी म्हटलं की, सरकारचा देशाच्या अन्नदातावर विश्वास नाही आणि त्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देत नाही. सरकारचा मतदारावर विश्वास नाही, त्यामुळे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




