पुणे जिल्हा | खासदार डॉ. कोल्हे किंग मेकर ठरणार?

सोरतापवाडी, (वार्ताहर) – नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे निवडून आले. त्यामध्ये शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा सिंहाचा वाटा असून त्यावेळी आमदार अशोक पवार हे कोल्हे यांच्यासाठी किंगमेकर ठरले होते. तसेच आता येणार्या विधानसभा निवडणुकीत खासदार डॉ. कोल्हे हे अशोक पवार यांच्यासाठी किंग मेकर ठरणार का याबाबत चर्चा रंगली आहे.
अडीच वर्षांपूर्वी राजकारणात सत्तांतर होऊन शिवसेनेचे दोन गट पडले तर दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात एकमेव आमदार अशोक पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात राहिले.
तर आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, खेडचे आमदार दिलीप मोहिते, हडपसरचे आमदार चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटात सामील झाले.
2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे निवडून आले. त्यावेळी सुद्धा अॅड. अशोक पवार यांनी त्यांना भक्कम साथ दिली. अशोक पवार यांनी योग्य नियोजन करून मतदारसंघात संपर्क ठेवत कोल्हे यांना शिरूर व हवेली तालुक्यातून मताधिक्य दिले. या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खासदार मिळाल्यामुळे 15 वर्षांनंतर उर्जितावस्था आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट तयार झाले.
2024च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्यामध्येच निवडणूक होऊन पुन्हा एकदा अमोल कोल्हे निवडून आले. शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांनी अशोक पवार यांचा प्रचार करून किंग मेकर होणार का अशी चर्चा मतदारसंघात चालू आहे.
त्याचे उत्तर 23 नोव्हेंबरलाच मिळेल
शिरूर लोकससभा मतदारसंघात एकमेव आमदार घेऊन डॉ. कोल्हे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली व ती जिंकली त्यामध्ये अशोक पवार यांनी हिरीरीने प्रचार करून कोल्हे यांना विजयी करण्यात मदत केली.
तसेच आता विधानसभेत कोल्हे यांनी शिरूर-हवेलीत अशोक पवार यांचा हिरीरीने प्रचार करून त्यांच्या विजयात हातभार लावणार का याचे उत्तर 23 नोव्हेंबरलाच मिळेल असे मतदारांचे म्हणणे आहे.





