Pune District : पुणे-दौंड-बारामती रेल्वे प्रवासाला गती देण्यासाठी हालचाली
Pune District : सध्या सुरू असलेल्या डिझेल बहुउद्देशीय स्थानिक गाड्या वेळेवर धावाव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. नोकरी व व्यवसायासाठी रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचावा, यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले.

चौफुला : पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार राहुल कुल यांनी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांची भेट घेऊन रेल्वे प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. पुणे, दौंड आणि बारामती परिसरातील रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
सध्या सुरू असलेल्या डिझेल बहुउद्देशीय स्थानिक गाड्या वेळेवर धावाव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. नोकरी व व्यवसायासाठी रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचावा, यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले.
तसेच वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून दौंड ते पुणे आणि पुढे लोणावळ्यापर्यंत विद्युत स्थानिक गाड्या सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. दौंडला उपनगराचा दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र पाठवून दौंड मार्ग उपनगरीय म्हणून घोषित करण्याची शिफारस केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
याबाबत पुढील कार्यवाही लवकर करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. महिला व दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित डबे उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी ठळकपणे मांडण्यात आली. त्यांच्या सुरक्षिततेसाठी या सुविधा तातडीने सुरू करून अधिकृत घोषणा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
दौंड-पुणे फेऱ्या वाढविण्याची मागणी
दरम्यान, हडपसर–यवत उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी उपाय म्हणून स्थानिक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विशेषतः सकाळी ८:२५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दौंड–पुणे दरम्यान नवीन स्थानिक गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हा पाठपुरावा पुढेही सुरू राहणार असल्याचे आमदार कुल यांनी स्पष्ट केले.





