PUNE : प्राण्यांचे स्थलांतरण ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’मध्ये; वनविभागाचा निर्णय

पुणे – गैरव्यवस्थापनेच्या समस्येमुळे आणि त्यासंबंधी आलेल्या सततच्या तक्रारींमुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील “वन्यजीव प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्रा’तील वन्य प्राण्यांना बावधन येथील “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ (टीटीसी) येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ऑगस्टपर्यंत हे स्थलांतरण पूर्ण करण्यात येईल, असे वनविभागातर्फे सांगण्यात आले.
कात्रज येथील रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरची वनविभागाकडून चौकशी सुरू आहे. कारण, एप्रिल आणि जूनमध्ये केलेल्या दोन वेगवेगळ्या तपासात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. वन्यजीव व्यवस्थापन ही एक मोठी चिंतेची बाब होती आणि तपासणी अहवालांनी बचाव केंद्रांमध्ये वन्य प्राण्यांबद्दल गैरवर्तन आणि माहितीचा अभाव हे या चौकशीत अधोरेखित करण्यात आले आहे.
या बचाव आणि पुनर्वसन केंद्राच्या व्यवस्थापनासाठी “इंडियन हर्पेटोलॉजिकल सोसायटी’ (आयएचएस) ही कंपनी “आउटसोर्स’ करण्यात आली होती, मात्र या सेंटरचे काम थांबवण्याचा विचार त्या कंपनीने बऱ्याच दिवसांपूर्वी केला आहे, असे कात्रज येथील रेस्क्यू सेंटरचे क्युरेटर असलेले श्रीराम शिंदे यांनी सांगितले. सोसायटीने यापूर्वीच महापालिकेला तसे लेखीही कळवले आहे. यामध्ये बचाव केंद्रात सध्या अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या व्यवस्थापनाचा मुख्य मुद्दा होता. अलीकडेच वनविभागाने वन्य प्राण्यांवर तसेच ज्यांना दीर्घकालीन काळजी घ्यावी लागते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बावधनमध्ये “टीटीसी’ची सुविधा निर्माण केली आहे.
तीन स्वयंसेवी संस्थांनी ही नवीन सुविधा चालवण्यास स्वारस्य दाखवले आहे. मुलाखतीची फेरी झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊन तातडीने कामाला सुरुवात होईल. किमान दहा वर्षे तरी या संस्थेने हे सेंटर चालवले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. प्राण्यांच्या सवयींच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असते.
“कात्रज रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमधील प्राण्यांना बावधन येथील “टीटीसी’ येथे स्थलांतरित करण्याचा विभागाचा विचार आहे. सध्या आम्ही ही सुविधा चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या स्वयंसेवी संस्थेला (एनजीओ) अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि आम्ही प्राण्यांना या सुविधायुक्त सेंटरमध्ये स्थलांतरीत करू शकू, असे उप वनसंरक्षक महादेव मोहिते म्हणाले.





