पुणे | टणटणीमुळे बिबट्या आऊट ऑफ रीच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात प्रशासन आणि नागरिकांची झोप उडवून मुक्तपणे संचार करत असलेला बिबट्या हा केवळ “टणटणी’मुळे “आऊट अॉफ रीच’ झाल्याचे सांगितले जात आहे.
“टणटणी’ किंवा “घाणेरी’ असे या वनस्पतीचे नाव आहे. हिचे शास्त्रीय नाव “लॅंटाना’ असे आहे. हिची पाने मोठी असतात आणि ती उंच वाढते. ही काटेरी वनस्पती असून, ती जमिनीवर पसरत जाऊन तिची जाळीही तयार होते. ही जाळी अशा प्राण्यांना लपण्यासाठी प्रचंड मदत करते.
बिबट्याने याच परिस्थितीचा फायदा या संग्रहालयात घेतला आहे. तो या वनस्पतीच्या आड तो दडून बसल्याने, रेस्क्यू टीमला त्याला बेशुद्ध करण्यासाठी “डार्ट’ मारणे अवघड झाले आहे. “डार्ट’ या झाडांमध्ये अडकून रहात आहे. ही वनस्पती या प्राणीसंग्रहालयात प्रचंड मोठ्या प्रमाणात फैलावली आहे. ती वेळीच काढून न टाकल्याने आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
प्राणी संग्रहालयाचा मेंटेनन्स, या झुडुपांची छाटणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे. केवळ हेच प्राणी नव्हे तर, पर्यटकांची सुरक्षितता आणि एकूणच स्वच्छतेच्या दृष्टीने हे अतिशय आवश्यक आहे. मात्र ते होत नसल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.
टणटणी ही वनस्पती भारतीय नसून ती पाश्चात्य आहे. तिची वाढ वेगाने होत असल्याने ती मोठ्या प्रमाणात फोफावते. कमी कालावधीत मोठे क्षेत्र काबिज करते. अन्य देशी वनस्पतींसाठी ती अत्यंत घातक आहे. ही आणि अशा वनस्पती समूळ नष्ट व्हाव्यात, त्याचे भारतातून उच्चाटण व्हावे या हेतूने आम्हीही कार्यरत आहोत.- डॉ. सचिन पुणेकर, पर्यावरण शास्त्रज्ञ तथा संस्थापक अध्यक्ष, बायोस्फियर्स




