बारामतीत दूध वाटप करून आंदोलन !

जळोची : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी राज्यात दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यांनी केलेल्या आव्हानावरुन आज बारामतीत ठीक ठिकाणी दूध वाटप करून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दुधाला ५ ते १० रुपये दर वाढवून मिळावा, खाजगी दूध डेअरीत १९ रुपयांपर्यंत दुधाचे दर खाली उतरले आहेत. त्यामुळे दूध दर वाढ होणे आवश्यक असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी सांगितले .
दूध दरवाढीसाठी करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनात कोणत्याही प्रकारे दुधाची नासाडी न होता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून दूध वाटप करून बारामती तालुक्यात अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ९० टक्के शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असल्याचेही ढवाण यांनी सांगितले.







