महाराष्ट्रातील आणखी एक संस्था दिल्लीला हलवली; भाजपकडून खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप

मुंबई – केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राचे पद्धतशीर खच्चीकरण करीत असून त्यांनी महाराष्ट्रातील आणखी एक संस्था राज्याबाहेर हलवली आहे असा आरोप कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नागपुरात केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे मुख्यालय आहे ते आता दिल्लीत हलवण्यात आले आहे. 1958 पासून ते नागपुरात कार्यरत होते.
सरकारचा हा निर्णय राज्यावरील आकसापोटीच घेण्यात आला असून या निर्णयाचा आम्ही निषेध करतो असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की ही संस्था महाराष्ट्रात असण्याला कोणाचाच आक्षेप नव्हता, पण गेली चारपाच वर्षे ही संस्था महाराष्ट्रातून हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. तो डाव अखेर केंद्र सरकारने साधला आहे.
या संस्थेची देशभरात 50 विभागीय कार्यालये, 9 उपविभागीय कार्यालये, याचे काम नागपुरातील संस्थेत चालत होते. कामगारांच्या सक्षमीकरणासाठी ही संस्था कार्यरत होती.
मोदी सरकारने या आधीही महाराष्ट्रातील अनेक महत्वाचे प्रकल्प आणि संस्था राज्यातून अन्यत्र हलवून महाराष्ट्राचे खच्चीकरण केले असून त्यांचे हे काम अजूनही चालूच आहे असेही सावंत यांनी म्हटले आहे. या आधी पोलिस अकादमी, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र महाराष्ट्राबाहेर नेण्यात आले असून मुंबईतील हिऱ्यांचा मोठा उद्योगही महाराष्ट्राच्या बाहेर नेला गेला आहे असा आरोपही सावंत यांनी केला.





