Dog Bite : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्यात मोठी वाढ झाली आहे. त्यातच अलीकडेच उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने आठ वर्षांच्या मुलीचा दोन आठवड्यांनी मृत्यू झाला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. मृत चिमुकलीच्या आईने उपचारासाठी रेबीज प्रतिबंधक लसीऐवजी घरगुती उपचार वापरले असल्याने हा मृत्यू ओढवला असल्याची माहिती समोर आली आहे. सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC), ब्लॉकचे प्रमुख डॉ जितेंद्र वर्मा यांनी याविषयी माहिती दिली , की कुटुंब उपचारासाठी केंद्रात आले होते आणि त्यांना एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. मात्र, त्यांनी त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. ८ वर्षाच्या मुलीला १०-१५ दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावला होता. तिने या घटनेची माहिती तिच्या आईला दिली होती, तिने तिच्यावर उपचार करण्यासाठी घरगुती उपाय केले. मृत चिमुकली व कुटुंब हे बह ब्लॉकच्या चौसांगी गावातील रहिवासी असून तिचे वडील मजूर आहेत आई गृहिणी आहे. डॉक्टरांनी सांगितले की २४ तासांच्या आत रेबीज प्रतिबंधक लसीचा पहिला डोस, तिसऱ्या दिवशी दुसरा डोस, सातव्या दिवशी तिसरा डोस आणि शेवटचा डोस २८ व्या दिवशी द्यावा लागतो. अन्यथा रेबीजची लागण होण्याचा व मृत्यूचा सुद्धा धोका उद्भवतो. रेबीजची काही स्पष्ट लक्षणे म्हणजे हायड्रोफोबिया (पाण्याची भीती), मान दुखणे आणि उलट्या होणे.