पुणे | पैशांसाठी आईचा खून, मुलगा फरार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संगणक अभियंता मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह बाथरुमध्ये टाकून पळ काढला. ही घटना एनआयबीएम रोड कोंढवा येथील कुबेरा गार्डन सोसायटीत दि. २४ ते २८ मे या कालावधीत घडली आहे. मृतदेह कुजल्यामुळे फ्लॅटमध्ये दुर्गंधी सुटली होती. लता आल्फ्रेड बेंझामिन (वय ७३) असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मिलींद बेंझामिन (४३ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉर्थी (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. मिलिंद याला मद्याचे व्यसन आहे. नोकरी गेल्यापासून तो बेरोजगार आहे. मिलिंद हा फिर्यादींचा लहान भाऊ आहे. मिलिंद हा आईसोबत पैशांसाठी वाद करत असे. त्यातूनच त्याने आईचा खून केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे यांनी दिली.
फिर्यादी आणि त्यांची बहीण हे आईसोबत फोनद्वारे संपर्कात असत. दि. २४ मे रोजी फिर्यादींचे आईसोबत बोलणे झाले होते. दि. २६ मे रोजी फिर्यादींनी आईच्या मोबाइलवर मेसेज केला.
मात्र, उत्तर आले नाही. फोन केला असता, तो देखील उचलला गेला नाही. त्यामुळे त्यांनी बहिणीला फोन करून माहिती दिली. दरम्यान, दि. २८ मे रोजी सोसायटीतील लोकांनी आई राहत असलेल्या फ्लॅटमधून वास येत असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी धाव घेतली, तेव्हा आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
कॉल द पोलिस
मिलिंद याने आईचा खून केल्यानंतर मृतदेह बाथरुमध्ये टाकून पळ काढला. त्याने दरवाज्यावर मॉम इन इनसाईड डोन्टं गो इन..कॉल द पोलीस असे लिहले होते. तसेच पळून जाताना त्याने आईचा मोबाईल लंपास केल्याचे दिसून आले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपी मुलाल दारुचे व्यसन आहे. पैशासाठी तो आईसोबत वाद करत होता. त्याने चाकूने वार करून आईचा खून केला आहे. याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




