माता न तू वैरिणी ! चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करून बॅगेत घेऊन जात होती एआय कंपनीची सीईओ ; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या, कारण वाचून बसेल तुम्हालाही धक्का

Mother Killed Son: कर्नाटकातील चित्रदुर्ग मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या महिला सीईओने आपल्या पोटच्या 4 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर ही हत्या कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ही महिला आपल्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन गोव्याहून कर्नाटकला जात होती, मात्र पोलिसांच्या सतर्कतेने तिला अटक करण्यात आली आहे. महिलेकडे मुलाचा मृतदेह सापडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सुचना सेठ हिचे 2010 मध्ये लग्न झाले होते. 2019 मध्ये तिच्या मुलाचा जन्म झाला त्यानंतर पुढच्या वर्षांपासून म्हणजेच 2020 पासुंन तिच्यात आणि पतीमध्ये काही कारणाने वाद सुरू झाला. हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मुलाच्या वडिलांना रविवारी मुलाला भेटता येईल, असे आदेश न्यायालयाने दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी महिलेवर दबाव आला कारण तिला पतीने आपल्या मुलाला भेटू नये असे वाटत होते. त्यामुळे योजनेनुसार आरोपी महिलेने शनिवारी मुलासह गोव्याला गेली. ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती त्याच हॉटेलच्या रूममध्ये तिने आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या केली. आपल्या पतीने आपल्या मुलाला भेटू नये, असे त्या महिलेला वाटत होते. त्यामुळेच तिने मुलाची हत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.
गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये ही महिला थांबली होती, त्या हॉटेलमध्ये तिने आपल्या चार वर्षांच्या मुलालाही सोबत आणले होते. महिला हॉटेलमधून बाहेर पडू लागली तेव्हा मुलगा तिच्यासोबत नव्हता. महिलेला एकटी जाताना पाहिल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिला मुलाबाबत विचारणा केली. यावर महिलेने सांगितले की, आपण आधीच मुलाला घरी पाठवले आहे. महिला हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिची खोली तपासली असता त्यांना तेथे रक्ताचे डाग आढळून आले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
हॉटेलमधून या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले आणि हॉटेलमधून महिलेला घेऊन गेलेल्या टॅक्सी चालकाला बोलावून घेतले. टॅक्सी चालक स्थानिक असल्याने त्याचा नंबर शोधण्यात पोलिसांना फारशी अडचण आली नाही. टॅक्सीत महिला एकटीच असल्याचे टॅक्सी चालकाने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाला ती महिला जिथे असेल तिथे तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन तिच्या ताब्यात देण्यास सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सी चालकाने महिलेला जवळच्या पोलीस ठाण्यात नेले आणि तिला अटक करण्यात आली. हे पोलीस ठाणे कर्नाटकातील चित्रदुर्ग भागात होते. त्यानंतर गोवा पोलिसांनी चित्रदुर्ग गाठून महिलेला अटक केली. गोव्यातील कँडोलीममध्ये महिलेने हा गुन्हा केला आहे. गोव्याचे डीजीपी जसपाल सिंह यांनी मुलाच्या हत्येप्रकरणी महिलेला अटक केली आहे. गोवा क्राइमचे एसपी लवकरच या प्रकरणाची पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.





