‘ट्रम्प यांचे आयात शुल्कविषयीचे बहुतेक आदेश बेकायदेशीर’; अमेरिकेतल्या न्यायालयाने ओढले ताशेरे

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेलेआयात शुल्कविषयक बहुतेक आदेश बेकायदेशीर असल्याचे अमेरिकेतल्या अपीलीय न्यायालयाने म्हटले आहे. हे आदेश अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी विसंगत असल्यामुळे आता ते मागे घ्यावे लागू शकतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मात्र जर हे आयात शुल्क मागे घेतले गेले तर आपल्या देशाचे फार मोठे नुकसान होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले असून लागू केलेले आयात शुल्क मागे घेतले जाणार नाहीत, असे ठामपणे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क लागू करण्याच्या धोरणाला अनुसरून अनेक देशांवर मोठे आयात शुल्क लागू केले आहे. या वाढीव आयात शुल्कामुळे जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे.
अनेक देशांबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिघडले आहेत आणि अमेरिकेबरोबरची समिकरणे सुधारण्यासाठी काही देशांनी नाईलाजाने ट्रम्प यांच्या आयात शुल्कांना मान्य केले आहे.
अपीलीय न्यायालयाने जरी ट्रम्प यांच्या वाढीव आयात शुल्कांना बेकायदेशीर म्हटले असले, तरी या संदर्भात ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी हे आयात शुल्क तुर्तास जसे आहे, तसे लागू ठेवण्यास मान्यता दिली आहे.
व्यापारी तूट आणि असमतोल आयात शुल्क अमेरिका कधीही मान्य करणार नाही. मित्र देश किंवा अन्य व्यापारी भागीदारांकडून आयात शुल्कामधील अडथळे आणि अनावश्यक अटींचा अडथळा दूर व्हायला हवा. यासाठीच वाढीव आयात शुल्क लागू केले गेले असून ते यापुढेही कायम असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.





