दिल्ली – पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (#IPL2023) 16 व्या हंगामासाठी आज मिनी लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडतोय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग नोंदवला आहे. लिलावात अगदी नवनवीन निकाल लागताना दिसत आहेत. नवख्या खेळाडूंना जास्त तर अनुभवी खेळाडूंना कमी किमंत मिळत असल्याचे दिसत आहे.
इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुकला तब्बल 13.25 कोटींना सनरायझर्स हैदराबादने विकत घेतलं आहे. तसेच इंग्लंडच्या सॅम करनला पंजाब किंग्जने तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलंय. सॅम करनला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागलीये. तर एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणाऱ्या अनुभवी अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) केवळ 50 लाखांना चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं आहे.
Rahane is now Manjal! 💛#SuperAuction #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/ol0ClDUQsx
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 23, 2022
अजिंक्य रहाणे मागील काही वर्षात खराब फॉर्मशी झुंजत आहे. कसोटीमध्ये स्पेशल फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जात होतं. पण आता कसोटी संघातही त्याला जागा मिळत नसल्याने यंदा तो अनसोल्ड राहील असं वाटत होतं. पण 50 लाखांना चेन्नईनं त्याला विकत घेतलं आहे.
दरम्यान, अजिंक्य रहाणेला आयपीएल 2022 सिझनसाठी कोलकाता नाइट राइडर्ससंघाने 1 कोटी रुपयांत विकत घेतले होते. मात्र, आयपीएल 2022 च्या 7 सामन्यांत त्याला केवळ 133 धावाच करता आल्या होत्या. आयपीएल 2022 मध्ये खराब प्रदर्शन केल्याने यावर्षी कोलकाता नाईट राइडर्सने त्याला रिलीज केले होते. आता आयपीएल 2023 सीझनच्या लिलावात रहाणेला चेन्नई सुपर किंग्सने 50 लाखात विकत घेतलं असून तो आता या आयपीएलमधून आपला फॉर्म परत आणतो का? तसेच त्याच संपणारे करिअर तो वाचवू शकले का? हे पाहावे लागेल.