ओडिशात ४०,००० हून अधिक महिला बेपत्ता, राहुल गांधींचा भाजप सरकारवर हल्लाबोल

भुवनेश्वर – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भुवनेश्वर येथील बारामुंडा मैदानात आयोजित ‘संविधान बचाओ समावेश’ रॅलीत ओडिशातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, ओडिशात ४०,००० हून अधिक महिला बेपत्ता झाल्या असून, त्या कुठे गेल्या याची कोणतीही माहिती नाही. “महिलांवरील अत्याचार रोज घडतात, पण सरकारला याची पर्वा नाही,” असे ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, “ओडिशा सरकारचे एकच काम आहे, गरीब जनतेचे धन लुटणे. यापूर्वी बीजेडी सरकारने हेच केले, आता भाजप सरकार तेच करत आहे. एकीकडे गरीब, दलित, आदिवासी, शेतकरी आणि मजूर आहेत, तर दुसरीकडे ५-६ अब्जाधीश आणि भाजप सरकार आहे. ही लढाई केवळ काँग्रेस कार्यकर्ते आणि ओडिशातील जनता एकत्र लढून जिंकू शकतात.”
#WATCH | Bhubaneswar: Lok Sabha LoP Rahul Gandhi says, “Something new has begun. More than 40,000 women in Odisha have disappeared. Till date, it is not known where did these women go. There is atrocity against women here every day. They are raped. 15 women are raped in Odisha… pic.twitter.com/GRMMrVU4BS
— ANI (@ANI) July 11, 2025
त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. “महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या गेल्या, तसेच बिहारातही प्रयत्न होत आहे. आयोग भाजपसाठी काम करतो, स्वतःचे कर्तव्य विसरला आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “अदानी ओडिशा सरकार आणि नरेंद्र मोदींना चालवतात. जगन्नाथ रथयात्रेत अदानींसाठी रथ थांबवले जातात, हे सरकार फक्त अब्जाधीशांचे आहे,” असे ते म्हणाले.
आदिवासींच्या जमिनीवरून त्यांना हटवले जाते, PESA कायदा लागू होत नाही, असे सांगत राहुल गांधींनी काँग्रेस आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला. या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.





