क्रूरतेचा कळस…! २५ हुन अधिक कुत्र्यांची विष देऊन हत्या; अकोल्यात हळहळ

अकोला : अकोला शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तब्बल २५ पेक्षा अधिक मोकाट श्वानांची विष देऊन क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अकोला शहरातील गुडधी परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. २५ पेक्षा अधिक श्वानांवर विषप्रयोग केल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सर्वत्र मोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी निर्बीजीकरण सुरू केले आहे. यामुळे श्वानांची संख्या काही अंशी कमी झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, उमरी ते गुडधी मार्गावर मोकाट श्वान रस्त्यालगत झुंडीने दिसून येतात.
एका अज्ञात व्यक्तीने सुमारे २५ पेक्षा अधिक श्वानांना विष देऊन ठार मारल्याची घटना घडली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी ४ एप्रिल रोजी सिव्हिल लाइन पोलिसांत गणेश नारायण जसनपुरे (५०, रा. गुडधी) यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली आहे.
फिर्यादीत त्यांनी सांगितले की, या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला असून, अशा क्रूर कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.





