Akola News – राज्यात गॅसचा तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यात गॅस सिलिंडरसाठी रांगाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभा राहवे लागत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच, अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे एका वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात प्रशासनाविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅसच्या रांगेत उभारेलेल्या अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचे दुर्दैवी निधन झाले. यदुराज गॅस एजन्सी येथे सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी ते रांगेत उभे असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, गॅसच्या रांगेत वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजनशून्यतेवर कठोर टीका केली आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव सिरसाठ यांचा जीव वाचला असता, असे त्यांनी म्हटले.