Akola News : ‘दहा कोटी रुपये दे, नाहीतर दोन दिवसात तुझा गेम करू’; काँग्रेस आमदाराला बिश्नोई गँगकडून धमकी
Akola News : अकोला जिल्ह्यातल्या दुसऱ्या आमदाराला धमकी मिळाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क

Akola News : अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकरकडून 10 कोटीच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना 17 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता च्या दरम्यान धमकीचा कॉल आल्याची माहिती आहे. “दोन दिवसात 10 कोटी रुपये दे, नाहीतर दोन दिवसात तुझा गेम करू”, अशी शुभम लोणकरकडून आमदार पठाण यांना धमकी देण्यात आली आहे. शुभम लोणकरकडून आलेला कॉल हा कॅलिफोर्नियावरून आल्याचं समोर आलं आहे.
आमदार पठाण यांना आलेल्या धमकीनंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. चार शस्त्रधारी पोलीस पठाण यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. धमकी प्रकरणात आमदार पठाण आणि पोलिसांकडून अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. Akola News
आमदारांच्या सुरक्षेत मोठी वाढ
याआधी अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनाही धमकी देण्यात आली होती. अकोला जिल्ह्यातल्या दुसऱ्या आमदाराला धमकी मिळाल्याचे समजताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
आमदार साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून त्यांच्या संरक्षणासाठी 4 शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
कोण आहे शुभम लोणकर ?
बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या नेव्होरी बुद्रुक गावचा रहिवासी आहे. शुभम लोणकरकडून दोन आमदारांना धमक्या आल्याने अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि आता रोहीत शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी शुभम लोणकर यानं स्वीकारली होती.
या आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्तुलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. अकोल्यात त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याचे जाळे आता दुबईसह आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरल्याची चर्चा आहे.
लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते.
हेही वाचा:
SIR Campaign : मतदान करायचंय? मग आता ‘हा’ पुरावा द्यावा लागणार; निवडणूक आयोगाचा नवा नियम पाहा




