‘पीएम मित्रा पार्क’मुळे 1 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा – देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे.
वर्धा येथे आज पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला तसेच अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वर्धा येथील पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाही – फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार उपलब्ध होईल. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाही, परंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा सारख्या योजनेच्या माध्यमातून बाजारपेठेला अनुकूल असलेल्या वस्तुंची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य कारागिरांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ समाजातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचत आहे. बलुतेदार समाजसमुहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी या योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे प्रकल्प गतिमानतेने पुर्ण केल्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुक करण्यास उत्सुक आहेत. गडचिरोली येथे स्टील उद्योग तसेच महापे येथे सेमी कंडक्टर या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.





