Monsoon Red Alert: महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! पुण्यासहित ‘या’ ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे
Monsoon Red Alert: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सून सक्रिय; सलग पाचव्या दिवशी पुण्यात संततधार कायम.

Monsoon Red Alert – राज्यात पावसाचा जोर वाढला असून, गेल्या २४ तासांत पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टी झाली आहे. शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. दरम्यान, पुढील २४ तासांसाठी पुणे जिल्ह्यासह रायगड, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला असून, या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. पुणे जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, घाट विभागात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर वाढला आहे. ताम्हिणी घाट परिसरात तब्बल ३१० मिमी पावसाची नोंद झाली, तर डुंगरवाडी परिसरात सर्वाधिक ३९८ आणि भिरा येथे ३८६ मिमी पावसाची नोंद झाली.
लोणावळा परिसरात २६३ मिमी पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. यंदाच्या हंगामातील ही उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुणे शहर आणि उपनगरांमध्ये रस्ते जलमय झाले असून, पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरासह अन्य काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात झालेला पाऊस
डुंगरवाडी ३९८, भिरा ३८६, ताम्हिणी ३१०, शिरगाव २७५, दावडी, लोणावळा २६३, वळवण २२९ मिलिमीटर.




