maharashtra weather : राज्यात मान्सून परतीचा प्रवास सुरू; उकाड्यात लक्षणीय वाढ

maharashtra weather – राज्यात काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परतीच्या पावसानेही मोठा दणका दिला असून मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात पिके भुईसपाट झाली. तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतही गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असल्याने मुंबईत उन्हाचा ताप आणि उकाड्यात वाढ झाली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून मुंबईसह इतर भागात तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. तसेच सरासरी तापमानातही वाढ झाली आहे. सरासरी तापमान ३२ अंशांपर्यंत पाहोचले आहे.
यंदा ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा ताप फारसा नसणार, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दिवसाचे तापमान साधारण ३२-३३अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर किमान तापमान मात्र सरासरीइतके राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्याने मुंबईकरांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळणार आहे.
देशभरातूनही मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू आहे. दिल्लीत तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत पावसाची शक्यता नाही. ज्यामुळे येत्या काही दिवसांत हवामान सामान्य राहील. हवामान विभागाने तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप आणि उत्तर भारतात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडूच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केरळमध्ये ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दरम्यान लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे.





