Monsoon Alert : परतीचा मान्सून रेंगाळला! पण या ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट ; पुढील ४८ तासांत पावसाचा अंदाज काय? जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील पावसाचा जोर ओसरला असून, पुढील दोन दिवसांत पावसाचे प्रमाण आणखी कमी होईल. दि. ४ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर, सोलापूर, बीड,धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली असून, या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.परतीचा मान्सून रेंगाळला असून, परिणामी त्याची वाटचाल सध्या स्थिर आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर असलेले अति तीव्र दाबाचे क्षेत्र उत्तर वायव्य दिशेकडे आगेकूच करून ओडिशा किनारपट्टी ओलांडली आहे.
आज (दि. ३) पहाटे त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. पुढील २४ तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होऊन उत्तर छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.पुढील ४८ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि ३० ते ४० ताशी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत विशेषत: पूर्व विदर्भात दि. ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे. राज्यात एकीकडे पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत असताना, दुसरीकडे काही जिल्ह्यांत हवामान कोरडे आणि कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पावसानंतर ऑक्टोबर हीटचा चटकाही चांगलाच जाणवेल, असे दिसून येत आहे.





