Maharashtra Weather Update : राज्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळल्या. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला, पण रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांवर संकट ओढवले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोलीसह काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून, पुढील दोन दिवस विजा, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांत पडणार मुसळधार? हवामान विभागाने 23 तसेच 24 फ्रेब्रुवारी अशा दोन दिवसात राज्यात अने ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या शक्यतेनुसार 23 तारखेला मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी पासवाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या. आता 24 फेब्रुवारी रोजीदेखील राज्यातील सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ‘या’ जिल्ह्यांत मोठं नुकसान धाराशिव तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान. पाणी साचल्याने ज्वारी काळी पडण्याची भीती. हरभरा, द्राक्ष, आंबा, गहू या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता. वाशिम गहू, कांदा बिजवाई आणि हरभरा पिके बहरात असतानाच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज. रोगराई वाढून उत्पादन घटण्याची चिंता; शेतकरी आर्थिक ताणात. सिंधुदुर्ग फोंडाघाट परिसरात अवकाळी पाऊस आणि धुके. आंबा-काजू बागांना फटका बसण्याची भीती; बागायतदार चिंतेत. बीड परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारात ज्वारी पिके आडवी पडली; कणसांना पाणी लागून उत्पादन घटण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामा आणि आर्थिक मदतीची मागणी. भंडारा पहाटे ४ वाजेपासून वादळासह पाऊस; चना, वाटाणा, लाखोरी पिके काढणीच्या अवस्थेत. ओलाव्यामुळे गुणवत्ता आणि उत्पादनावर परिणाम; शेतकऱ्यांमध्ये भीती. हिंगोली वसमत शहरासह काही भागात हलका पाऊस; गहू, तूर, आंबा पिकांना नुकसानाची शक्यता. यवतमाळ महागाव तालुक्यातील कोंदरी, वाकण परिसरात गहू पिकाचे मोठे नुकसान; वादळी वाऱ्यासह पाऊस. नागपूर कळमना एपीएमसी मार्केटमध्ये उघड्यावर ठेवलेली धान्याची शेकडो पोती भिजली; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान. वर्धा रोडवरील साईनगर परिसरात झाड कोसळून कार चिरडली; काचा फुटली, वाहतूक बाधित (जीवितहानी नाही). हवामान विभागाचा अंदाज बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि द्रोणिकेच्या प्रभावाने विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाला प्रोत्साहन मिळाले आहे. IMD नागपूरने पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवली असून, वाऱ्याचा वेग ३०-४० किमी/तास राहू शकतो. जिर्ण इमारती आणि छप्पर असलेल्या घरातील नागरिकांनी सावध राहावे. या अवकाळीमुळे रब्बी पिके (ज्वारी, गहू, हरभरा, चना, आंबा, काजू इ.) सर्वाधिक धोक्यात आहेत. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि प्रशासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. २५ फेब्रुवारीनंतर हवामान सुधारण्याची शक्यता आहे, पण सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.