कर्नाटकात आढळला ‘मंकीपॉक्स’चा रुग्ण, हा आजार नेमका काय आहे?

Monkeypox case in Karnataka: मंकीपॉक्सची लागण झालेला रुग्ण कर्नाटकातील मंगळुरू येथे आढळला आहे. ही व्यक्ती दुबईवरून परतली होती. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने देखील संसर्गाची पुष्टी केली आहे.
मंकीपॉक्सची लागण झालेली ही व्यक्ती दुबईवरून परतली होती. 17 जानेवारीला दुबईवरून परतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरावर पुरळ आणि तापाची लक्षणं जाणवली. त्यानंतर त्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘उडुपी जिल्ह्यातील करकला तालुक्यातील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला कोणत्याही गंभीर प्रकारची समस्या जाणवत नाहीये.’ तसेच, मंकीपॉक्स फक्त खूप जवळून संपर्कात आल्यावरच पसरतो. कोव्हिड-19 पेक्षा याचा धोका कमी असतो. अधिकाऱ्यांनी लोकांनी यामुळे घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील केले आहे.
रुग्णाची पत्नी व्यक्तीला विमानतळावर आणण्यासाठी गेली होती. त्यामुळे प्राथमिक संपर्क म्हणून महिलेला पुढील काही दिवस वेगळे राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी क्लेड आयबी नावाचा मंकीपॉक्सचा एक नवीन व्हेरिएंट शोधला आहे. 2022 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील या आजाराला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले होते. वर्ष 2024 मध्ये या आजाराची लागण झालेले जवळपास 30 रुग्ण भारतात आढळले होते.
मंकीपॉक्स आजार काय आहे?
मंकीपॉक्सला Mpox म्हटले जाते. हा एक विषाणूजन्य आजार असून, उंदीर, माकड सारख्या प्राण्यांपासून मानवामध्ये याचा संसर्ग पसरतो. 1970 मध्ये आफ्रिका खंडात पहिल्यांदा मंकीपॉक्स आढळला. हा एक संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचा संसर्ग झाल्यावर प्रामुख्याने ताप येणे, शरीरावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणं दिसतात. तसेच शरीरावर पुरळ आल्याने खाज देखील सुटते.





