देशात मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण; आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी करत दिले खबरदारीचे निर्देश

नवी दिल्ली : मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.तर आता भारतातही संशयित मंकीपॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली असून या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आफ्रिकन देशांत एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्सची साथ वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे.
गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे. आफ्रिकेतील बाराहून अधिक देशांत पसरत असलेल्या या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, संशयित रुग्णाला रुग्णालयात दाखल करून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. मंकीपॉक्सच्या आजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. मंकीपॉक्सचे विषाणू असलेल्या देशातून त्याने प्रवास केल्याने हा संशय बळावला आहे.
आरोग्य विभागाच्या नियमानुसार रुग्णाला विलग करण्यात आले आहे. संभाव्य स्त्रोत ओळखण्यासाठी आणि संसर्ग जाणून घेण्याकरता संपर्क ट्रेसिंग चालू आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या कोणतेही चिंतेचे कारण नाही. कारण हे प्रकरण राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने आयोजित केलेल्या जोखीम मूल्यांकनाशी संबंधित आहे. अशा वेगळ्या प्रवासाशी संबंधित प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे आणि संभाव्य जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहे, असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.





