ICC T20 World Cup Qualifier : मंगोलियाच्या नावावर क्रिकेटमधील अतिशय लाजिरवाण्या विक्रमाची नोंद…

T20 World Cup Asia Qualifier (Singapore vs Mongolia) : आगामी टी20 विश्वचषक आशियाई पात्रता फेरीत गुरुवारी मंगोलिया आणि सिंगापूर यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये मंगोलियाच्या नावावर एका अतिशय लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. हे क्वालिफायर सामने मलेशियामध्ये खेळले जात आहेत, जेथे मंगोलियन संघ प्रथम फलंदाजी करताना धावांवर सर्वबाद झाला. यासह मंगोलिया आता आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यात सर्वात कमी धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत ‘आयल ऑफ मॅन’ (Isle of Man) सह संयुक्तपणे प्रथम स्थानावर आला आहे.
या सामन्यात मंगोलिया संघाच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. चार फलंदाजांनी एक तर दोन फलंदाजांनी प्रत्येकी दोन धावा केल्या. खेळाडूंनी केवळ 8 धावा केल्या, उर्वरित दोन धावा या अतिरिक्त माध्यमातून (Wide Ball) आल्या. अवघ्या 4 धावसंख्येवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता आणि कसा तरी मंगोलियन संघ 10 षटकात सर्वबाद 10 धावांचा आकडा गाठू शकला.
सिंगापूरने 5 चेंडूतच जिंकला सामना….
सिंगापूरसमोर केवळ 11 धावांचे लक्ष्य होते, पण कर्णधार मनप्रीत सिंग डावाच्या पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा बळी ठरला. मात्र त्यानंतर विल्यम सिम्पसन आणि राओल शर्मा यांनी पुढच्या चार चेंडूत आपल्या संघाला विजयाकडे नेले. सिम्पसनने चौकार मारून संघाचा विजय निश्चित केला. सिंगापूरने 0.5 षटकात 1 बाद 13 धावा करत मंगोलियाविरूध्दच्या सामना 115 चेंडू आणि 9 गडी राखून जिंकला.
A victory margin of 9 wickets and 115 balls to spare – Insane 👀
How would you describe this ICC Men’s T20 World Cup Asia Qualifier A match in one word or emoji❓ pic.twitter.com/ZU0MNeevBq
— CricWick (@CricWick) September 5, 2024
मंगोलियाचा इतिहास खूपच खराब…
मंगोलियन संघाचा इतिहास खूप वाईट राहिला आहे कारण आजपर्यंत हा संघ टी-20 क्रिकेटमध्ये 50 पेक्षा कमी धावसंख्येवर एकूण 7 वेळा ऑलआऊट झाला आहे. तीन वेळा या संघाला डावात 20 धावांही करता आल्या नाही. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात कमी धावसंख्या करणाऱ्या संघाच्या यादीत मंगोलियाचा पहिल्या चार मध्ये तीनदा समावेश आहे. या वर्षी मे महिन्यात जपानविरुद्ध मंगोलिया 12 धावांत ऑलआऊट झाला होता तर काही दिवसांपूर्वी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगने या संघाला 17 धावांवर गुंडाळले होते.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या नोंदवणारे संघ (Lowest mens T20 Totals)
1. मंगोलिया (विरूध्द सिंगापूर) : धावसंख्या 10, साल 2024
2. आयल ऑफ मॅन (विरूध्द स्पेन) : धावसंख्या 10, साल 2023
3. मंगोलिया (विरूध्द जपान) : धावसंख्या 12, साल 2024
4. मंगोलिया (विरूध्द हाँगकाँग) : धावसंख्या 17, साल 2024
5. तुर्की (विरूध्द चेक प्रजासत्ताक) : धावसंख्या 21, साल 2019





