Deool Band 2 : अन् सगळे पैसेच संपले…! ‘देऊळ बंद 2’साठी शाहरुख खान ठरला देवदूत; प्रवीण तरडेंनी सांगितला 42 लाखांचा किस्सा
या संकटाच्या काळात बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची निर्मिती संस्था रेड चिलीज एंटरटेनमेंट यांनी केलेल्या मदतीची माहिती त्यांनी प्रथमच उघड केली.

Shahrukh Khan | Deool Band 2 | Pravin Tarde : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद 2‘ची जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत 80 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तिकीटबारीवरील यशामुळे हा चित्रपट वर्षातील सर्वात चर्चेचा मराठी चित्रपट ठरला आहे. (Deool Band 2)
या यशाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे विविध माध्यमांना मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आलेल्या आर्थिक अडचणींचा खुलासा केला. विशेष म्हणजे, या संकटाच्या काळात बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची निर्मिती संस्था रेड चिलीज एंटरटेनमेंट यांनी केलेल्या मदतीची माहिती त्यांनी प्रथमच उघड केली.
नुकतंच एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी सांगितले की, चित्रपटाचे सुरुवातीचे बजेट अवघे 12 लाख रुपये होते. मात्र, निर्मिती प्रक्रियेदरम्यान खर्च वाढत गेला आणि तो तब्बल 42 लाख रुपयांपर्यंत पोहोचला. त्यामुळे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक असलेला डीसीपी (Digital Cinema Package) तयार करण्यासाठीही पैसे उरले नव्हते.
याबाबत बोलताना ते म्हणाले, “पुण्यातील हेमंत गुजराती यांच्या डॉन स्टुडिओचेही या प्रवासात मोठे योगदान आहे. मात्र, चित्रपटाचा डीसीपी तयार करण्यासाठी आवश्यक निधी आमच्याकडे नव्हता. अशावेळी आम्ही रेड चिलीज एंटरटेनमेंटकडे मदतीची विनंती केली.” (Deool Band 2)
प्रवीण तरडे यांच्या म्हणण्यानुसार, ही माहिती थेट शाहरुख खान यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी आपल्या तांत्रिक टीमकडून चित्रपटाबाबत माहिती घेतली. ‘मुळशी पॅटर्न’चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा चित्रपट असल्याचे समजल्यानंतर शाहरुख यांनी विशेष लक्ष दिले. कारण सलमानने ‘अंतिम’ सिनेमा केला होता. (Deool Band 2 )
तरडे म्हणाले, “डीसीपीचे काम पैसे भरल्याशिवाय होत नाही हा नियम असतो. पण चित्रपट चांगला असल्याचे कळल्यानंतर शाहरुख खान यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. रेड चिलीजने जवळपास 40 ते 45 टक्के बिल माफ केले. ‘सिनेमा चांगला बनवलाय, पैशांचं नंतर बघू,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. आमच्यासाठी ही खूप मोठी मदत होती.”
बॉक्स ऑफिसवर धडाका :
‘देऊळ बंद 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. चित्रपटात मोहन जोशी, स्नेहल तरडे, रमेश परदेशी, सविता मालपेकर आणि मंगेश देसाई यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
‘देऊळ बंद 3’ कधी येणार?
‘देऊळ बंद 2’च्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीही घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात ‘देऊळ बंद 3’ कधी येणार, सध्याचा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आणि बॉक्स ऑफिसवर तो आणखी कोणते विक्रम प्रस्थापित करणार, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.







