Roshan bhajankar : आई, तुझा शब्द पूर्ण केला.! ‘बिग बॉस’ फेम रोशन भजनकरने घेतली नवी कोरी थार, अखेर कष्टाचं सोनं झालं
आपल्या साधेपणामुळे ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात प्रेक्षकांचं मन जिंकणारा 'रोशन भजनकर' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Roshan bhajankar : एकेकाळी उदरनिर्वाहासाठी रेल्वे यार्डमध्ये सिमेंटची पोती उचलणारा, दिवसभर कष्ट करून रात्री बॉडीबिल्डिंगचा सराव करणारा आणि आपल्या साधेपणामुळे ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात प्रेक्षकांचं मन जिंकणारा ‘रोशन भजनकर’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मात्र यावेळी कारण बिग बॉसचं घर किंवा त्याचा फिटनेस नाही, तर त्याच्या आयुष्यात आलेलं एक मोठं स्वप्न आहे. रोशनने नवी कोरी महिंद्रा थार घरी आणली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही महिन्यांच्या अंतरात त्याने दुसरी गाडी खरेदी केली आहे.
रोशनने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या नव्या गाडीची झलक दाखवली. या व्हिडीओमध्ये त्याचा आनंद तर दिसतोच, पण त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि भावनाही लक्ष वेधून घेतात. रोशनसाठी ही केवळ एक नवी गाडी नसून, अत्यंत संघर्षातून उभं केलेल्या आयुष्याच्या प्रवासातील आणखी एक मोठं यश आहे.
‘आई, तुझा शब्द पूर्ण केला…’
नवी थार घरी आणल्यानंतर रोशनने शेअर केलेला व्हिडीओ विशेष भावनिक आहे. “आई मी तुझा शब्द पूर्ण केला. जे दिवस आपण पाहिले ते आता नाही राहिले. बघ आई, तुझ्या मुलाने काय केलं… जय महाराष्ट्र,” असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
व्हिडीओमध्ये रोशनचं संपूर्ण कुटुंब दिसत असून, स्वप्नातली गाडी घराच्या दारात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतो. त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर करत ‘स्वतःवर विश्वास ठेवा’ असा संदेशही दिला आहे.
तीन महिन्यांत दुसरी गाडी!
रोशनच्या या नव्या गाडीच्या बातमीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यातच त्याने आपली पहिली गाडी खरेदी केली होती. आता काही महिन्यांतच त्याने आणखी एक नवी गाडी आपल्या ताफ्यात दाखल केली आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सिमेंटची पोती उचलण्यापासून ‘बिग बॉस’पर्यंतचा प्रवास
रोशन भजनकरची खरी ओळख त्याच्या संघर्षाच्या कहाणीमुळे झाली. अमरावतीतील रेल्वे गुड्स यार्डमध्ये तो रोजंदारीवर काम करत असे. दिवसभर कष्टाची कामं केल्यानंतर रात्री तो बॉडीबिल्डिंगचा सराव करायचा. त्याच्या संघर्षाबद्दल ‘बिग बॉस मराठी ६’मध्येही चर्चा झाली होती.
फिटनेसची आवड आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये प्रवेश मिळाल्याने त्याचा प्रवास आणखी एका मोठ्या टप्प्यावर पोहोचला. शोमध्ये त्याने साधेपणा आणि सकारात्मक वृत्तीमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.






