Kaun Banega Crorepati : बॉलिवूडची सर्वात ग्लॅमरस गर्ल करणार ‘कौन बनेगा करोडपती’चं सूत्रसंचालन; कोण आहे ती अभिनेत्री? एकदा पाहाच…
हे नाव केवळ बॉलिवूडपुरते मर्यादित नाही. महाराष्ट्राशी तिचे घट्ट आणि भावनिक नाते आहे. तिच्या अभिनयाने, नृत्याने आणि खास व्यक्तिमत्त्वाने गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे

Kaun Banega Crorepati : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय क्विझ शो ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. कारण यावेळी या कार्यक्रमाच्या हॉटसीटवर केवळ स्पर्धकच नाही, तर सूत्रसंचालकाच्या खुर्चीवरही एक मोठं आणि लोकप्रिय नाव पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, माधुरीने या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केल्याचेही समजते. त्यामुळे अधिकृत घोषणेची चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे.
माधुरी दीक्षितने ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वासाठी प्रोमो शूट केला आहे. या नव्या सूत्रसंचालकाची अधिकृत झलक देणारा पहिला प्रोमो १० ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या पर्वाच्या प्रीमियरदरम्यान प्रेक्षकांसमोर आणला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हिंदीतील ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या पर्वाच्या सुरुवातीलाच मराठी प्रेक्षकांसाठीही एक मोठी घोषणा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या लाडक्या ‘धकधक गर्ल’ची करोडपतीच्या मंचावर एंट्री?
माधुरी दीक्षित हे नाव केवळ बॉलिवूडपुरते मर्यादित नाही. महाराष्ट्राशी तिचे घट्ट आणि भावनिक नाते आहे. तिच्या अभिनयाने, नृत्याने आणि खास व्यक्तिमत्त्वाने गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये असलेली तिची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी ‘कोण होणार करोडपती’साठी तिची निवड केल्याचे सांगितले जात आहे.
माधुरीचा सहज संवाद, हसतमुख व्यक्तिमत्त्व, नृत्याची खास शैली आणि पडद्यावरची तिची जबरदस्त उपस्थिती यामुळे ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाला एक वेगळीच रंगत येण्याची शक्यता आहे.
सचिन खेडेकर ते नागराज मंजुळे :
‘कोण होणार करोडपती’च्या आतापर्यंतच्या पर्वांना मराठी मनोरंजनविश्वातील अनेक लोकप्रिय चेहऱ्यांनी सूत्रसंचालक म्हणून वेगळी ओळख दिली आहे. सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यापूर्वी या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली आहे.
आता या यादीत माधुरी दीक्षितचे नाव जोडले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नव्या पर्वात तिची होस्टिंग स्टाइल कशी असेल, स्पर्धकांशी तिचा संवाद कसा रंगेल आणि तिच्या खास अंदाजामुळे कार्यक्रमाला कोणता नवा टच मिळेल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
‘बकेट लिस्ट’नंतर पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला :
माधुरी दीक्षितचा मराठी मनोरंजनसृष्टीशी यापूर्वीही जवळचा संबंध राहिला आहे. २०१८ मध्ये ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटातून तिने मराठी प्रेक्षकांशी थेट नाते जोडले. आता ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून माधुरी पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार असल्याचे चित्र आहे.






