मम्मी-पप्पा सॉरी..! अन् विद्यार्थिनीने केली आत्महत्या; सुसाईड नोट चर्चेत

औरंगाबाद – शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. डोकेदुखीचा त्रास सहन होत नसल्याने एका 21 वर्षे विद्यार्थिनीने चक्क आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले आहे. माझी डोकेदुखी आता मला सहन होत नाही. मी हे पाऊल माझ्या डोकेदुखीमुळे उचलत आहे. याचा तुम्हाला प्रचंड त्रास होईल. मम्मी-पप्पा सॉरी, अशी सुसाईड नोट लिहून ठेवत या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे.
ही घटना 31 जुलैच्या रात्री हर्सूलमधील सुरेवाडी भागात घडली आहे. प्रिया रमेश बुजाडे (वय 21 वर्षे, सुरेवाडी, हर्सूल) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रिया आई-वडिलांसोबत राहत होती, तिला मोठी बहीण व लहान भाऊ आहे. प्रिया अभ्यासात हुशार होती.
शांत स्वभावाच्या प्रियाला टेक्नॉलॉजीतच करिअर करण्याची आवड होती. दरम्यान, तिला डोकेदुखीचा प्रचंड त्रास सुरु झाला होता. डोकेदुखी तिला सहन होत नव्हती. त्यामुळे अभ्यास होत नव्हता. दरम्यान याचा परिणाम तिच्या शिक्षणावर होत होता. त्यामुळे परीक्षेत सुद्धा तिला कमी गुण मिळायचे. नुकताच तिने दिलेला एक पेपरही कमी गुणांचा सोडवला होता.
दरम्यान, सोमवारी (31 जुलै) ती अभ्यासासाठी तिच्या खोलीत होती. तेथेच तिने आत्महत्या केली. ती बाहेर येत नसल्यामुळे पालकांनी आवाज दिला. प्रियाकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.





