Pakistan Participation : ‘आम्हाला फरक पडत नाही, ICCने दुसरा संघ शोधावा!” बांगलादेशसाठी पाकिस्तानचं टोकाचं पाऊल
Pakistan Participation : मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान टी-२० विश्वचषकात खेळणार की नाही सरकार ठरवेल.

Pakistan Participation in T20 World Cup 2026 uncertain : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना क्रिकेट विश्वात मोठा भूकंप झाला आहे. बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता पाकिस्तानच्या सहभागावरही टांगती तलवार निर्माण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी दिलेल्या एका धक्कादायक विधानामुळे खळबळ उडाली असून, पाकिस्तान या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले मोहसिन नक्वी?
मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट केले की, ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल. नकवी म्हणाले, “आम्ही सध्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरून परतण्याची वाट पाहत आहोत. जर सरकारने आम्हाला स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यास सांगितले, तर आयसीसीने २२ व्या संघाला (पर्यायी संघ) सामील करावे, आम्हाला त्याचा फरक पडत नाही.”
बांगलादेशच्या मुद्द्यावरून आयसीसीला घेरले –
PCB chairman Mohsin Naqvi responded to Pakistan’s participation in the #T20WorldCup and Bangladesh’s unfair treatment by ICC.#Cricket | #Pakistan | #MohsinNaqvi | #Lahore | #Bangladesh pic.twitter.com/uaPdH87SO3
— Khel Shel (@khelshel) January 24, 2026
सुरक्षेचे कारण देत भारतात येण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने स्पर्धेतून बाद करून त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली आहे. या निर्णयावर नक्वी यांनी संताप व्यक्त केला. “बांगलादेशवर अन्याय झाला आहे. मी आयसीसीच्या बैठकीतही हेच सांगितले की, एका देशासाठी एक नियम आणि दुसऱ्यासाठी दुसरा नियम असू शकत नाही. बांगलादेश हा आयसीसीचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि त्यांना अशा प्रकारे वागणूक देणे चुकीचे आहे,” असे नकवी यांनी नमूद केले.
भारत-पाकिस्तान वादाला नवे वळण?
पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांचे टी-२० विश्वचषकातील सहभागाबाबत मोठं वक्तव्य
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे आधीच द्विपक्षीय मालिका बंद आहेत. आता बांगलादेशच्या निमित्ताने पाकिस्ताननेही ‘आडमुठी’ भूमिका घेतल्याने वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आले आहे. जर पाकिस्तानने माघार घेतली, तर आयसीसीला पुन्हा एकदा वेळापत्रकात मोठा बदल करावा लागेल.





