Pakistan T20 World Cup : बांगलादेशपाठोपाठ पाकिस्तानही वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार? स्कॉटलंडची एन्ट्री निश्चित
Pakistan T20 World Cup : आयसीसी टी-२० विश्वचषकाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेते हे पाहणे मनोरंजक ठरेल. यापूर्वी, पाकिस्तानने बांगलादेशला सातत्याने त्रास दिला होता.

Pakistan Participation in T20 World Cup 2026 : आगामी टी-२० विश्वचषकातून बांगलादेशने माघार घेतल्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेशने आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिल्यानंतर आता पाकिस्तानच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बांगलादेशच्या बहिष्काराच्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डातही (PCB) अस्वस्थता पसरली असून, पाकिस्तान विश्वचषक खेळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचा सहभाग धोक्यात?
आयसीसीच्या नियमानुसार, विश्वचषक सुरू होण्याच्या एक महिना आधी म्हणजेच ७ जानेवारीपर्यंत सर्व देशांनी आपला संघ जाहीर करणे बंधनकारक होते. मात्र, पाकिस्तानने अद्याप आपल्या १५ सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पाकिस्तान सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या तयारीत आहे, परंतु विश्वचषकाबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान बांगलादेशच्या भूमिकेला पाठिंबा देत विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहे.
वेळापत्रक बदलणार की संघ?
विश्वचषक सुरू व्हायला आता केवळ १५ दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत आयसीसी शेड्यूलमध्ये कोणताही बदल करणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडचा संघ विश्वचषकात खेळताना दिसेल. बांगलादेश ज्या गटात (Group C) होता आणि ज्या तारखांना त्यांचे सामने होणार होते, त्याच वेळापत्रकानुसार आता स्कॉटलंडचे सामने खेळवले जातील.
हेही वाचा – मोठी बातमी! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग! अखेर टी-२० विश्वचषकातून घेतली माघार
पुढील दोन दिवस महत्त्वाचे –
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लवकरच ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी आपला संघ जाहीर करणार आहे. जर या घोषणेवेळी त्यांनी विश्वचषकासाठीही संघ जाहीर केला, तर ते स्पर्धेत सहभागी होतील. मात्र, संघ जाहीर न केल्यास पाकिस्तानही बांगलादेशच्या पावलावर पाऊल ठेवून स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आयसीसीकडून लवकरच बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडच्या समावेशाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.






