मोहन मांझी होणार ओडिशाचे मुख्यमंत्री; 24 वर्षांनंतर झाला राज्यात नेतृत्वबदल

भुवनेश्वर – ओडिशा राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून मोहन मांझी यांची निवड करण्यात आली आहे. या राज्यात स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला भाजपने तयार केला आहे. यातील एक उपमुख्यमंत्री पार्वती परिडा असणार आहेत तर दुसे उपमुख्यमंत्री म्हणून के. व्ही. सिंह देव यांची निवड करण्यात आली आहे.
अलिकडेच झालेल्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी करत नवीन पटनायक यांना सरकारमधून जाण्यास भाग पाडले. पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजू जनता दलाचे सरकार सलग दोन दशकांपेक्षा अधिक काळ सत्तेवर होते व खुद्द नवीन पटनायक २००० पासून राज्याचे मुख्यमंत्री होते. एकूण २४ वर्ष ९८ दिवस ते या पदावर होते. आता मोहन मांझी यांच्या खांद्यावर भाजपने ओडिशाची धुरा सोपवली आहे.
मोहन मांझी दलित समाजातील असून या समुदायात आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी भाजपने त्यांची निवड केली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या क्योंझर विधानसभा मतदारसंघातून मांझी यांचा विजय झाला आहे. ५२ वर्षीय मांझी यांनी चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे.
राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री पार्वती परिडा निमापारा विधानसभा मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देव पटनगढ मतदार संघातून जिंकले आहेत.





