Mohan Bhagwat : स्वार्थी हितसंबंध आणि वर्चस्वाची लालसा हीच जगातील वाढत्या संघर्षांची मुख्य कारणे असून, केवळ एकता, शिस्त आणि धर्माच्या आचरणातूनच जगात चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी केले. नागपूर येथे विश्व हिंदू परिषदेच्या (विदर्भ प्रांत) नवीन कार्यालयाच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना भागवत म्हणाले की, गेल्या २००० वर्षांपासून जगाने संघर्ष मिटवण्यासाठी विविध विचारप्रवाहांचे प्रयोग केले, परंतु त्यात यश आले नाही. आजही धार्मिक असहिष्णुता, सक्तीचे धर्मांतर आणि श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या अहंकारामुळे मानवा-मानवांत भिंती उभ्या आहेत. भागवत यांनी नमूद केले की, जग आज शक्ती या एकाच तत्त्वावर चालत असून तिथे ‘जंगलचा कायदा’ दिसून येतो. याउलट, भारत हा मानवतावादावर विश्वास ठेवणारा देश आहे. सर्वजण एकमेकांशी जोडलेले आहेत, हीच भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा आज आधुनिक विज्ञानही मान्य करत आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत केवळ भारतच हे संघर्ष थांबवू शकतो, अशी भावना जगभरातून व्यक्त होत आहे. डगमगत असलेल्या जगाला धर्माचा भक्कम पाया देऊन त्यात समतोल प्रस्थापित करणे, ही आता भारताची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. नैतिक मूल्यांची गरज धर्म म्हणजे केवळ ग्रंथ नव्हे, तर तो आचरणात दिसला पाहिजे, असे सांगत भागवत यांनी शिस्त आणि नैतिक मूल्यांच्या जोपासनेवर भर दिला. वैयक्तिक कष्ट आणि सातत्यपूर्ण सरावातूनच समाजात सलोखा निर्माण होऊ शकतो. जगाला आज संघर्षाची नव्हे, तर सहकार्याची गरज असून भारताचा शांतताप्रिय स्वभावच जगाला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.