Mohammed Shami : मोहम्मद शमी कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करु शकेल का? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

Why is Mohammed Shami’s comeback being delayed : भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी फिटनेस समस्यांमुळे बराच काळ संघाबाहेर आहे. आता तो 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. शमीने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळला होता.
या सामन्यात त्याने पहिल्या डावात 29 षटकांत 122 धावा देत दोन विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात 16.3 षटकांत 39 धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, भारताला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर शमीला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.
फिटनेसच्या समस्येमुळे संघातून बाहेर –
शमी गेल्या पाच कसोटी मालिकांमध्ये खेळू शकला नाही. यामध्ये दक्षिण आफ्रिका (डिसेंबर 2023-जानेवारी 2024), इंग्लंड (जानेवारी 2024-मार्च 2024), बांगलादेश (सप्टेंबर 2024-ऑक्टोबर 2024), न्यूझीलंड (ऑक्टोबर 2024-नोव्हेंबर 2024) आणि ऑस्ट्रेलिया (नोव्हेंबर 2024-जानेवारी 2025) यांचा समावेश आहे. अलीकडेच झालेल्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्याच्या निवडीची शक्यता होती, पण फिटनेसच्या समस्येमुळे त्याला संघात स्थान मिळाले नाही.
दुलीप ट्रॉफी ठरणार निर्णायक –
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 34 वर्षीय शमीला फॉर्ममुळे नव्हे, तर फिटनेसच्या समस्येमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले. निवड समितीने शमीशी चर्चा केली होती, पण तो स्वतःच्या फिटनेसबाबत पूर्णपणे आश्वस्त नव्हता. सूत्रांनुसार, शमीचे कसोटी क्रिकेटमधील भवितव्य दुलीप ट्रॉफीतील त्याच्या कामगिरीवर आणि फिटनेसवर अवलंबून आहे. याशिवाय, शमीला लांब पल्ल्याच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनाची इच्छा आहे की नाही, हे देखील महत्त्वाचे आहे.
जर शमीने दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये ईशान किशनच्या नेतृत्वाखालील संघासाठी चांगली कामगिरी केली, तर त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मैदानावरील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान मिळू शकते. शमीने आतापर्यंत 64 कसोटी सामन्यांमध्ये २२९ विकेट्स घेतल्या असून, त्याचे पुनरागमन भारतीय संघासाठी मोठी बाब ठरू शकते.





