Mohammad Rizwan : रिझवानने पाकिस्तानची काढली लाज! लाईव्ह सामन्यात कर्णधाराने मैदानातून हाकललं, पाहा VIDEO

Mohammad Rizwan embarrassment video viral : पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार मोहम्मद रिझवान सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये (BBL) मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत आहे. मात्र, या लीगमध्ये रिझवानला एका अत्यंत लज्जास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागले. संथ फलंदाजीमुळे रिझवानला त्याच्याच कर्णधाराने चक्क ‘रिटायर्ड आउट’ (Retired Out) करून मैदानाबाहेर बोलावले, ज्यामुळे क्रिकेट विश्वात पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी सिडनी थंडर विरुद्धच्या सामन्यात रिझवान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. टी-२० फॉरमॅट असूनही रिझवान धावांसाठी संघर्ष करताना दिसला. त्याने २३ चेंडूंत केवळ २६ धावा केल्या. यात २ चौकार आणि १ षटकार असला तरी त्याचा स्ट्राईक रेट केवळ ११३.०४ होता. संघाला वेगाने धावांची गरज असताना रिझवानच्या या संथ खेळीमुळे कर्णधाराने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. कर्णधाराचा आदेश असल्याने नाईलाजाने रिझवानला मान खाली घालून मैदान सोडावे लागले.
Muhammad Rizwan has been retired out by the Melbourne Renegades 👀 #BBL15 pic.twitter.com/AuTGoTIHqb
— KFC Big Bash League (@BBL) January 12, 2026
रिझवानची टी-२० कारकीर्द धोक्यात?
रिझवानचा स्ट्राईक रेट हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला आहे. याच कारणामुळे त्याला पाकिस्तानच्या टी-२० संघातूनही वगळण्यात आले असून, २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी त्याच्या निवडीची शक्यता धूसर मानली जात आहे. विश्वचषकाच्या प्राथमिक संघातही त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
हेही वाचा – Team India Record : टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘या’ बाबतीत क्रिकेट विश्वात ठरला नंबर १ संघ
पाकिस्तानी खेळाडूंचा बीबीएलमध्ये फ्लॉप शो –
सीजनच्या सुरुवातीला बाबर आझम, रिझवान, शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांच्याबद्दल मोठी चर्चा होती, पण सर्वांची कामगिरी निराशाजनक ठरली आहे:
- शाहीन आफ्रिदी: दुखापतीमुळे मायदेशी परतला.
- हॅरिस रौफ: गोलंदाजीत प्रचंड महागडा ठरत आहे.
- बाबर आझम: सिडनी सिक्सर्सकडून खेळताना ८ सामन्यांत केवळ १५४ धावा केल्या (स्ट्राईक रेट १०४.०५).
- मोहम्मद रिझवान: ८ डावात २०.८७ च्या सरासरीने केवळ १६७ धावा (स्ट्राईक रेट १०१.८२).
पाकिस्तानच्या या दोन दिग्गज फलंदाजांच्या अत्यंत संथ स्ट्राईक रेटमुळे केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे, तर पाकिस्तानी माध्यमांमध्येही त्यांच्यावर कडाडून टीका केली जात आहे.





